Type Here to Get Search Results !

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा--जिल्हाधिकारी आशिष येरेकर



       अमरावती, दि. 22 : औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना रस्ते, वीज, पाणी प्राधान्याने देण्यात यावी. तसेच उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. तसेच उद्योजकांना पोषक वातावरण निर्मिती भर द्यावा, यामुळे त्यांचे उद्योग सुकर चालण्यास मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योग सहसंचालक निलेश निकम, प्रादेशिक अधिकारी राम लंके, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. कचरा कुंडींची संख्या वाढविण्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातील कचरा दररोज उचलण्याच्या सूचना देण्यात येतील. अतिक्रमणाचीही तक्रार उद्योजकांकडून येत असल्याने शहरी भागातील अतिक्रमण पोलिस आणि महापालिकेकडून कारवाईकरून काढण्यात येईल. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे उद्योग बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. उद्योगांना मुबलक पाणीपुरवठा होईल, याची दक्षता येण्यात यावी.

     अग्निशमन यंत्रणा ही सातत्याने समोर येणारी बाब आहे. त्यामुळे दोन्ही एमआयडीसीमधील अग्निशमन केंद्र हे एमआयडीसीला देण्यात येतील. त्यांच्याकडूनच दोन्ही केंद्र कार्यान्वित होतील. तसेच कामगारांसाठी असलेल्या ईएसआयसी रूग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रूग्णालयांचे बांधकाम तातडीने होण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली. यासोबतच खासगी रूग्णालयांचे देयक ईएसआयसीने तातडीने आदा करावेत. शहरातील एमआयडीसीला जोडण्यासाठी रस्त्यांची उपलब्धता करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Post a Comment

0 Comments