Type Here to Get Search Results !

महावितरणविरोधात ठिय्या आंदोलन : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे विद्युत समस्या महिन्याभरात निकाली न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा

 महावितरणविरोधात ठिय्या आंदोलन : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे  विद्युत समस्या महिन्याभरात निकाली न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा 



चांदूर रेल्वे:-

शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांवर उपाय न झाल्यामुळे आज नागरिकांनी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले. वारंवार वीज खंडितता, जुनाट ट्रान्सफॉर्मर, लूज वायर, स्मार्ट मीटर लादणे, कर्मचारी गैरहजेरी, हेल्पलाइन कार्यरत नसणे आदी मुद्यांवर शेकडो नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.


शहरात मागील अनेक महिन्यांपासून विजेच्या अनेक समस्या भेडसावत आहेत विविध कारणे सांगत विद्युत विभाग तासनतास लाईन बंद करत आहेत या सर्व समश्या विरोधात आज सकाळी ११ वाजता माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांनी महावितरण कार्यालय गाठून तिथेच ठिय्या आंदोलन केले आंदोलनामागील मुख्य मुद्द्यांमध्ये वारंवार वीज खंडितता आणि जुनाट ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले. नागरिकांनी स्मार्ट/प्रीपेड मीटर लादण्याची जबरदस्ती थांबवून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. लूज वायरमुळे अपघात होत असल्याने त्यांची मोफत दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त झाली. ठेकेदार-कर्मचारी संगनमतावर कठोर कारवाई करून कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. महावितरणची हेल्पलाइन नेहमी कार्यरत ठेवावी तसेच घरभाडे भत्ता घेऊनही गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. शेतीपूरक वीजपुरवठा नियमित होऊन सौर कृषीपंप व अनुदान योजनांना गती मिळावी, यासाठीही आंदोलनकर्त्यांनी ठाम आवाज उठवला.


तिन तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान नागरिकांनी स्पष्ट केले की, लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. अखेर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका महिन्यात सर्व समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काँग्रेस चे अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments