*धामणगाव रेल्वे येथे सोमवारी जप्त केलेल्या 250 ब्रास रेतीचा लिलाव*
अमरावती, दि. 17 (जिमाका) : धामणगाव रेल्वे तालुक्यातील सलाबतपूर येथे अवैध साठवणूक केलेली अंदाजे 250 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. या रेती साठ्याचा जाहीर लिलाव सोमवार, दि. 20 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सलाबतपूर येथील गट सर्व्हे क्रमांक 83/2 मध्ये अवैध स्वरूपात अंदाजे 250 ब्रास रेतीचा साठा आढळून आला होता. उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे यांनी या साठ्यावर जप्तीची कारवाई करून त्याच्या लिलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, जिल्हाधिकारी यांनी लिलावास मान्यता दिली आहे. त्यानुसार सोमवार, दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयात जाहिर लिलाव होणार आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या इच्छुक बोलीधारकांनी 25 टक्के रक्कम म्हणजेच 45 हजार 690 रूपये अनामत म्हणून जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम धनादेश, डिमांड ड्राफ्ट किंवा रोख स्वरूपात बोली सुरू होण्यापूर्वी जमा करावी लागणार आहे. नेमून दिलेल्या वेळेनंतर येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा लिलाव प्रक्रियेत विचार केला जाणार नाही. असे धामणगाव रेल्वेचे तहसिलदार अभय घोरपडे यांनी कळविले आहे.


Post a Comment
0 Comments