माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते चांदूर रेल्वेत न्यायालय इमारतीचे भूमिपूजन व नगर परिषदेला भेट
- नगरध्यक्षा यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा
चांदूर रेल्वे : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मानाचे स्थान भूषवणारे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचे चांदूर रेल्वे येथे आगमन होत असून, त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता त्यांच्या हस्ते येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यांनतर ११ वाजता चांदूर रेल्वे नगरपरिषदेला ते भेट देणार आहे, नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा भव्य शुभारंभही गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेमार्फत भव्य तयारी करण्यात आली असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. हे निमंत्रण नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा तसेच जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक निलेश विश्वकर्मा यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
यावेळी न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील व निमंत्रक म्हणून स्थानिक न्यायालयाचे न्यायधीश सुजित राठोड यांचीही उपस्थिती राहणार आहे
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे चांदूर रेल्वे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांमध्ये अभिमान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Post a Comment
0 Comments