Type Here to Get Search Results !

१३७ वर्षांची अखंड परंपरा; घुईखेडहून १२ जूनला पंढरीकडे वारीचे प्रस्थान संत बेंडोजी बाबा पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची लगबग; ९१० किलोमीटरचा पायी प्रवास करणार पूर्ण

 १३७ वर्षांची अखंड परंपरा; घुईखेडहून १२ जूनला पंढरीकडे वारीचे प्रस्थान संत बेंडोजी बाबा पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची लगबग; ९१० किलोमीटरचा पायी प्रवास करणार पूर्ण



चांदूर रेल्वे :


वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक असलेली घुईखेड येथील श्री संत बेंडोजी बाबा संस्थानची पायी दिंडी यंदाही मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तब्बल १३७ वर्षांची परंपरा जपणारी ही मानाची दिंडी १२ जून रोजी घुईखेड येथून प्रस्थान करणार असून २५ जुलै रोजी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.


घुईखेड ते पंढरपूर हा सुमारे ९१० किलोमीटरचा प्रवास वारकरी पायी पूर्ण करणार आहेत. विशेष म्हणजे पैठण आणि आळंदी मार्गे होणाऱ्या या वारीत सहभागी होणारे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा आणखी सुमारे २६० किलोमीटरचा प्रवास संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासोबत करणार आहेत. एकूण ४७ दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.


श्री परमपूज्य ब्रह्मलीन संत बेंडोजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित करण्यात येणारी ही दिंडी १२ जून रोजी घुईखेडहून निघून २५ जूनला पैठण येथे पोहोचेल. त्यानंतर २६ जून रोजी पैठणहून प्रस्थान करून ७ जुलै रोजी आळंदी गाठेल. ८ जुलै रोजी आळंदीहून पुढील प्रवास सुरू होऊन २५ जुलैला दिंडी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या दिंडीचे विशेष महत्त्व मानले जाते.


घुईखेड येथील दिंडीला संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात मानाचे स्थान आहे. माऊलींच्या रथामागे असलेल्या २१ मानाच्या दिंड्यांमध्ये या दिंडीचा १७वा क्रमांक असून विदर्भातून सहभागी होणारी ही एकमेव मानाची दिंडी असल्याचे विशेष मानले जाते.


इतिहासाची साक्ष देणारे संत बेंडोजी महाराज संस्थान हे अत्यंत प्राचीन असून वारकरी परंपरेचा वारसा जपत अनेक पिढ्यांपासून ही वारी सुरू आहे. बदलत्या काळात आधुनिक साधनसुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी पायी वारीची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने आणि भक्तिभावाने जपली जात असल्याचे या सोहळ्यातून दिसून येते.


दिंडीच्या संपूर्ण मार्गावर विविध गावांमध्ये वारकऱ्यांसाठी निवास, चहा, नाश्ता व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो वारकऱ्यांचा हा प्रवास केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचेही दर्शन घडविणारा ठरत आहे.

वारीत सहभागी होण्याची संधी


घुईखेड ते पंढरपूर पायी वारीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी संत बेंडोजी बाबा संस्थान, घुईखेड येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, विश्वस्त प्रवीण घुईखेडकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि नियोजन संस्थानतर्फे करण्यात येणार आहे. 


Post a Comment

0 Comments