चांदूर रेल्वे स्थानकाची खा. अमर काळे यांनी केली पाहणी
रेल रोको कृती समितीने वाचला प्रवाशांच्या हालअपेष्टांचा पाढा
रेल्वे स्टेशनची अवस्था पाहून खासदारांनी केली तिव्र नाराजी व्यक्त
चांदूर रेल्वे : - (ता. प्र.)
चांदूर रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था पाहून प्रवाशांच्या सहनशीलतेलाही मर्यादा येऊ लागल्या आहेत. या स्थानकावर दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. वरिष्ठ रेल्वे प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. प्रवाशांच्या या नाराजीतूनच रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी व इतर सदस्यांनी खासदार अमर काळे यांना रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याची विनंती केली. यानंतर खासदारांनी सोमवारी (ता. 22) दुपारी स्थानिक रेल्वे स्टेशनला भेट दिली. त्यांच्या पाहणीवेळी रेल रोको कृती समितीने आक्रमक सूर लावत समस्यांचा पाढा त्यांच्या समोर वाचला. रेल्वे स्टेशनची झालेली अवस्था पाहून खासदारांनीही तिव्र नाराजी व्यक्त करीत याबाबत डीआरएम यांच्यासोबत बैठक घेऊन सदर समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
स्थानकाची विदारक स्थिती शौचालयात पाण्याचा अभाव, प्लॅटफॉर्मवर घाणीचा साच, प्लॅटफॉर्मवर अंधार, आणि अपूर्ण पडून असलेली कामे अशी दुर्दशा पाहून प्रवाशांना धक्का बसतो. महिलांसाठी तर ही परिस्थिती आणखी भयावह आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल समिती सदस्यांनी थेट खासदारांपुढे ठेवला. यावेळी नागपूर–पुणे एक्स्प्रेसला तातडीने चांदूर येथे थांबा द्यावा, स्थानकाचे जीर्णोद्धार करून आवश्यक सुविधा उभाराव्यात, शौचालयात पाणी व प्रकाशव्यवस्था दुरुस्त करावी, रेल्वे आल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोच इंडिकेटर बसवावेत, दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी दिव्यांची सोय करावी, शिवाजी महाराज नगरजवळील भूमिगत मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, प्लॅटफॉर्मची उंची वाढवून अपघात टाळावेत, सि.सि.टी.व्ही. ची व्यवस्था करावी आदी मागण्या खासदारांसमक्ष मांडण्यात आल्या. यादरम्यान स्टेशन प्रबंधक दिपीका बाजपेयी यांच्यासोबत खासदारांनी चर्चा सुध्दा केली. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष मनोज कडू, रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, सदस्य मेहमुद हुसैन, विनोद जोशी, मदन कोठारी, प्रा. प्रसेन्नजित तेलंग, सतिश चौधरी, राजु वडतकर, बंडूभाऊ यादव, गजानन यादव, महादेव शेंद्रे, भिमराव खलाटे, अनिस सौदागर, सैय्यद जाकीर, सतिष देशमुख, राजुरा ग्रा.पं. सदस्य भुषण काळे, विनोद काळमेघ, सुधाकर यादव, संदीप हजारे, विनोद लहाणे, मारोतराव गिरासे यांसह अनेकांची उपस्थिती होती.
1)
लवकरच डीआरएम सोबत बैठक घेणार
मी सोमवारी चांदूर रेल्वेच्या दौऱ्यावर असतांना स्थानिक रेल कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनच्या समस्या संदर्भात पाहणी करण्याची विनंती केली असता मी सदर रेल्वे स्टेशनची पाहणी केली. या स्टेशनवरील समस्या व अवस्था बघितली असुन सदर स्टेशनची परिस्थिती समाधानकारक नाही. तसेच मी अंडर बायपास व रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी सुद्धा केली आहे. या सर्व समस्यांना घेऊन लवकरच डीआरएम, नागपूर यांच्यासोबत बैठक घेणार असून त्या समस्या तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न करेल. तसेच रेल्वे थांबा विषयी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंत्र्यांना पत्रव्यवहार करून त्यासंबंधी वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा करेल अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी यावेळी दिली.
2)
थेट अंडरबायपासमध्ये पोहचले खासदार
अंडर बायपास चे काम अद्यापही अपूर्णच असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा साचत आहे अशी तक्रार नागरिकांनी करताच खा. अमर काळे हे पायी जात थेट अंडरबायपासमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी अंडरबायपासमध्ये थेट पाण्याच्या मधात जाऊन पाहणी केली व ही परिस्थिती रेल्वे डीआरएम यांना सांगणार असल्याचे सांगितले. तसेच रेल्वे उड्डाणपुलाचीही त्यांनी पाहणी केली.





Post a Comment
0 Comments