चांदूर रेल्वेत आम आदमी पार्टीच्या युवती उमेदवाराला शिवीगाळ करत छेडछाड,निवडणुकीत कशाला उभी राहिली, ताबडतोब निवडणुकीतून माघार घे, अन्यथा जीवाने मारण्याची धमकीचांदूर रेल्वे पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
चांदूर रेल्वे -
सध्या चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतसे वातावरण थंडीतही तापू लागले आहे. अशातच चांदुर रेल्वे शहरातील एका प्रभागात आम आदमी पक्षाकडून नगरसेवक पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 22 वर्षीय युवती उमेदवाराला एकाने घरात घुसून शिवीगाळ करत छेडछाड केली. निवडणुकीत कशाला उभी राहिली ?, ताबडतोब निवडणुकीतून माघार घे, अन्यथा जीवाने मारण्याची धमकी सुध्दा दिल्याची घटना 27 नोव्हेंबरला रात्री 8.30 ते 8.40 वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध रात्री 11.45 वाजता गुन्हा दाखल केला आहे. रवि रामचंद्र कातोरे, रा. चांदूर रेल्वे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
प्राप्तमाहितीनुसार, तक्रारकर्ती युवती ही चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी तर्फे नगरसेवक पदाची निवडणूक लढवीत आहे. सदर युवती निवडणुकीमध्ये उभी झाल्यापासून तिला आरोपीतर्फे वेगवेगळ्या धमक्या येत होत्या, परंतु तिने त्यावर जास्त लक्ष दिले नाही. अशातच 27 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या प्रचाराकरिता ती सकाळपासून घरून निघाली होती व रात्री पक्षाची शेवटची प्रचार सभा टांगा गल्ली येथे संपल्यानंतर ती तिच्या राहते घरी गेली. त्यावेळी तिचे आई, वडील व बहीण हे एका कार्यक्रमांमध्ये गेले होते व त्यांनी घराची किल्ली ठेवली होती. त्या किल्लीने सदर युवतीने घराचे दार उघडून आतमध्ये केली असता अचानक आरोपी हा तिच्या मागून आला व त्याने अचानक तिचा डावा हात वाईट उद्देशाने पकडला. त्यामुळे सदर युवती अचानक घाबरली व तिने हात झटकला. त्यावेळी आरोपीने तिला शिवीगाळ करत म्हटले की, तू इलेक्शन मध्ये उभी कशाला राहिली, ताबडतोब निवडणुकी मधून माघार घे, अन्यथा तुला मारून टाकेल असे म्हणून जीवाने मारण्याची धमकी दिली. तसेच घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुद्धा केली. सदर युवती ही खूप घाबरली होती व तिने आरडाओरड केला असता आरोपी हा तेथून पळून गेला. यानंतर तिने घटनेनंतर लगेच चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन गाठून याबाबतची लेखी तक्रार दिली सदर तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी रवी रामचंद्र कातोरे याच्या विरुद्ध बीएनएस कलम 74, 333, 296, 351 (3) अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.
विरोधकांनी आमच्या उमेदवारांना त्रास देऊ नये - नितीन गवळी
निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आमच्या आम आदमी पक्षाच्या अनेक उमेदवारांना विरोधकांकडून त्रास देणे सुरू आहे. लहानसहान बाबींकडे दुर्लक्ष करीत आम्ही निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करीत आहो. मात्र 27 नोव्हेंबर रोजी घडलेली सदर घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. याशिवाय आणखी एका प्रभागातील पुरुष उमेदवाराला विरोधकांकडून मारण्याच्या धमक्या मिळत आहे. त्यामुळे विरोधकांनी सदर निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात लढवावी. आम्ही शांततेच्या मार्गाने निवडणूक लढवीत असून कुठल्याही पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवाराला त्रास दिलेला नाही. त्यामुळे आमच्याही उमेदवारांना कुणीही त्रास देऊ नये अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते नितीन गवळी यांनी दिली.
महिला उमेदवाराला धमकावणे म्हणजे लोकशाहीला थेट आव्हान
संपूर्ण शहरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणूक जवळ येत असतांना महिलेला अशा पद्धतीने धमकावणे हा राजकीय दडपशाहीचा अत्यंत निंदनीय आणि भ्याड प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
पुरुषांच्या विरुद्ध एकमेव महिला उमेदवार
सदर पीडित युवती ज्या प्रभागातील गटातून निवडणूक लढवीत आहे त्या गटात ही एकमेव महिला उमेदवार असून तिच्याविरुद्ध तीन इतर पक्षाचे पुरुष उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे सदर जागेच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले.


Post a Comment
0 Comments