स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करावे सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा
अमरावती, दि. 19 केंद्रीय आणि राज्य शासनात सेवेमध्ये रूजू होण्यासाठी स्पर्धा परिक्षा हा मार्ग आहे. यात प्राथमिक चाचणी, मुख्य परिक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यातून निवड केली जाते. या परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला वाशिम येथील सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा यांनी दिला.
जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा आणि उपजिल्हाधिकारी सुनिल टाकळे यांचे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी कौशल्या एस., सहायक आयुक्त विकास खंदारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, ग्रंथालय सहायक संचालक राजेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024च्या परिक्षेत 20वा क्रमांक पटकाविलेले आकाश वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केले. श्री. वर्मा यांनी, परिक्षा देण्यामागील उद्देश काय आहे, याचा विचार करून ही परिक्षा द्यावी. परिक्षा देण्याची संधी ही प्रत्येकाला असल्याने शासनात काम करण्याची संधी प्राप्त होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमुळे देशपातळीवर तसेच देशाबाहेरही सेवेची संधी प्राप्त होते. या परिक्षांची तयारी करीत असताना प्रामुख्याने अभ्यासक्रमावर लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे. परिक्षांमध्ये काही प्रश्न हे अत्यंत कठिण असतात. त्यावेळी दिलेल्या पर्यायापैकी कोणते उत्तर योग्य राहिल, याची पडताळणी केल्यास मार्क वाढविण्यास मदत होईल. प्रामुख्याने राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी या विषयांचा प्रामुख्याने अभ्यास करावा.
परिक्षांमध्ये वेळेचा सदुपयोग आणि यश मिळविण्यासाठी चाचणी परिक्षा देणे आवश्यक आहे. यामुळे परिक्षेचा सराव होण्यास मदत मिळते. निबंध लिहिताना दिलेल्या विषयाला न्याय देणे गरजेचे आहे. यासाठी भारतीय संविधान, चालू घडामोडी आणि इतर साहित्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच मुलाखतीला समोर जाताना समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय देण्याची तयारी केलेली असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य आणि संयम असणे आवश्यक असल्याचे श्री. वर्मा यांनी सांगितले.
श्री. टाकळे यांनी, स्पर्धा परिक्षा देण्यामागील उद्देश स्वच्छ असणे आवश्यक आहे. परिक्षेची तयारी करताना परिक्षांचा आकृतीबंध समजावून घेणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम आणि आयोगाची गेल्या वर्षातील प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. याचा सखोल अभ्यास करून या परिक्षांची तयारी करावी. प्राथमिक परिक्षा आणि मुख्य परिक्षांमध्ये कमी कालावधी असतो. त्यामुळे चाळणी परिक्षांची तयारी करताना मुख्य परिक्षेचा अभ्यास केल्यास लाभ मिळतो. त्यासोबतच केलेल्या अभ्यासातून स्वत:ची नोट काढल्यास त्याचा निश्चित फायदा मिळण्यास मदत होते. अभ्यास करताना स्वयंशिस्त महत्वाची असून यात अभ्यास आणि सराव महत्वाचा आहे. पूर्वीच्या परिक्षांचे प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास वेळेचा उपयोग आणि परिक्षांसाठी मानसिक तयारी होणे शक्य असल्याचे सांगितले.
विकास खंडारे यांनी स्पर्धा परिक्षांची कार्यशाळा आयोजनामागील उद्देश सांगितला. स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्यांकडून स्थानिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले.
सारिका काळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी आभार मानले.



Post a Comment
0 Comments