मातंग समाजाच्या आरक्षण-वर्गवारीसाठी मुंबई–नागपूर पदयात्रेचे चांदूर रेल्वेत उत्स्फूर्त स्वागत
चांदूर रेल्वे :
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे तसेच अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) लागू करण्यात यावे यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मुंबई–नागपूर पदयात्रेचे शनिवारी (ता. 4) चांदूर रेल्वे येथे दणदणीत स्वागत करण्यात आले.
पदयात्रा शहरात दाखल होताच स्थानिक मातंग समाजातील एस.आर. इंगळे, पंकज जाधव, उमेश भुजडणे, अनिल वानखडे, विनोद तिरडे, संतोष वाघमारे, बाळासाहेब सोरगिवकर, कृष्णा कलाने, सुधाकर वानखडे, नंदू सोरगिवकर, दिलीप कलाने, संतोष गुगलमने, गजानन गवई, अमोल खंडारे, विनोद वानखेडे, उमेश वानखेडे आदींसह मोठ्या संख्येने महिला व युवकांनी पदयात्रेतील कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत केले. शहरातील समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मातंग समाज गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर दुर्लक्षित राहिल्याचे सांगत, "आमचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत; यासाठी स्वतंत्र आरक्षण हाच एकमेव मार्ग आहे," असे विष्णू कसबे यांनी सांगितले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही १४ जिल्हे ओलांडणारी पदयात्रा काढण्यात येत असून येत्या १२ डिसेंबर रोजी हजारो कार्यकर्त्यांसह नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकवण्याची घोषणा त्यांनी केली.
१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून आरक्षण वितरणात न्याय देण्याचा मार्ग मोकळा केला. महाराष्ट्र शासनाला याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले असतानाही राज्यात आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही, याबद्दल समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हिवाळी अधिवेशनात मातंग समाजावरील वाढत्या अत्याचारांना आळा – अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांची जलदगती न्यायालयात सुनावणी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी – प्रलंबित शिफारसी तातडीने लागू कराव्यात, डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न – तसेच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी १००० कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करून महामंडळ तातडीने कार्यान्वित करावे, मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना – घरकुल अनुदान पाच लाख रुपये करण्यात यावे, लहुजी उस्ताद साळवे यांच्या नावाने राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार – शासनाने घोषित करावा, भूमिहीनांसाठी दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजना सुधारित – जिरायती जमिनीसाठी २५ लाख आणि बागायती जमिनीसाठी ३५ लाख प्रति एकर अनुदान देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राज्यातील महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहे. यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते.
---
मुंबई ते नागपूर अशी ही ऐतिहासिक पदयात्रा समाजाच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून नागपूर अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय दाखल होणार असल्याची माहिती लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे यांनी दिली.


Post a Comment
0 Comments