ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कामांतर्गत गट क्र. ५ मधील संरक्षण भिंतीचे काम तात्काळ स्थगित करा – श्री विठोबा संस्थानची मागणीजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; संरक्षण भिंतीमुळे इतर मंदिरे पाण्याखाली जाण्याची भीती
चांदूर रेल्वे :-
तालुक्यातील प्रसिद्ध कापुराची यात्रा म्हणून ओळख असलेल्या सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे सुरू असलेल्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कामांमध्ये अनियमितता व तांत्रिक त्रुटी असल्याचा गंभीर आरोप संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात संस्थानने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गट क्रमांक ५ मधील संरक्षण भिंतीचे काम तात्काळ स्थगित करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये गट क्रमांक ५ मध्ये संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र गट क्र.५चे प्रत्यक्ष मोजमाप व सिमांकन न केल्यामुळे या बांधकामात अनेक विसंगती आढळून आल्या आहेत. बांधकामासाठी चुकीची जागा निवडल्यामुळे परिसरातील लहान मंदिरांना धोका निर्माण झाला असून, काही मंदिरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, संरक्षण भिंतीसाठी खोदण्यात आलेला पाया नियोजित ठिकाणाऐवजी अन्यत्र खोदण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे गट क्रमांक ५ मध्ये अनावश्यक विभागणी होऊन मंदिर परिसरातील व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी भाविकांना पूजाअर्चा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाने संस्थानला कोणतीही पूर्वसूचना न देता कामे सुरू केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गट क्रमांक ५ मधील संरक्षण भिंतीच्या कामाची तात्काळ चौकशी करून काम थांबवावे व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे स्थानिक नागरिकांचे व भाविकांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments