Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून अशोक नगर ग्रामपंचायत वंचित? ग्रामविकास अधिकारी व संगणक परिचालकांवर षडयंत्राचा आरोप; कठोर कारवाईची मागणी

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून अशोक नगर ग्रामपंचायत वंचित? ग्रामविकास अधिकारी व संगणक परिचालकांवर षडयंत्राचा आरोप; कठोर कारवाईची मागणी




अशोक नगर ग्रामपंचायतचे प्रशासक सरपंच स्नेहल मनोज कडू यांच्या नेतृत्वात  जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन





धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अशोक नगर ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील पुरस्कार प्रक्रियेतून  षडयंत्राचा राचून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनातून  करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अशोक नगर ग्रामपंचायत प्रशासक सरपंच स्नेहल मनोज कडू यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी  रेखा साठवणे, प्रशासक समिती सदस्य ओंकारराव खंडारे, . मनीषा ठाकरे,. रेखा बगाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोजभाऊ कडू, प्रा. प्रफुल कडू, सिद्धेश साठवणे, सुशील कडू आदी उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अशोक नगर ग्रामपंचायत पात्र असतानाही शासनाच्या पोर्टलवर चुकीची माहिती अपलोड करण्यात आली. तसेच आवश्यक फॉरमेट वेळेत अपलोड न केल्याने ग्रामपंचायतीला ऑनलाईन प्रक्रियेत केवळ १८ गुण मिळाले. प्रत्यक्षात ऑफलाईन मूल्यमापनात ग्रामपंचायतीला ६९ गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.


ग्रामपंचायत प्रशासन, सदस्य व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून १६ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विविध विकासात्मक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. मात्र, ग्रामविकास अधिकारी व संगणक परिचालक यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरून ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रक्रियेतून बाहेर ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशोक नगर ग्रामपंचायतीला यापूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, पर्यावरण ग्रामसमृद्धी पुरस्कार तसेच लोकमत सरपंच पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे गावाची प्रतिमा मलीन करण्यासाठी शासन पोर्टलवर खोटी माहिती सादर करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार प्रताप अडसड यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments