Type Here to Get Search Results !

अमरावती चे रुग्ण सेवक सागर दामेकर यांना ‘रक्त भूषण’ पुरस्काराने सन्मानित




​अमरावती चे रुग्ण सेवक 
सागर दामेकर यांना ‘रक्त भूषण’ पुरस्काराने सन्मानित


​जागतिक रक्तदाता दिनानिमित्त यवतमाळ येथे गौरव सोहळा संपन्न.

​यवतमाळ/अमरावती 
१४ जून, ‘जागतिक रक्तदाता दिना’चे औचित्य साधून यवतमाळ येथील ‘धैर्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन’च्या वतीने आयोजित भव्य रक्तदान गौरव व सन्मान सोहळा २०२६ मध्ये अमरावती चे सेवाभावी कार्यकर्ते, रुग्ण सेवक सागर दामेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘रक्त भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
​सागर दामेकर हे सातत्याने गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यात आणि स्वतः अनेकदा रक्तदान करून इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. त्यांच्या याच निस्वार्थी समाजसेवेची दखल घेऊन फाउंडेशनने त्यांना या पुरस्काराने गौरविले.
​हा कार्यक्रम यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम समाजसेवक भाई अमन, भारतीय जैन संघटनेच्या अध्यक्षा मा. सारिका शहा, तसेच नगरसेवक मा. बिपिनभाऊ चौधरी आणि मा. नीरज वाघमारे उपस्थित होते.
​यावेळी विशेष अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी मा. अनिरुद्ध बक्षी, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. सुभाष ढोले आणि तहसीलदार मा. योगेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त एसबीआय मुख्य शाखा, यवतमाळचे चीफ मॅनेजर श्री. सुनील लांडे आणि भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय कांबळे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.
​या यशस्वी आयोजनाबद्दल धैर्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश ग. बघेल, सचिव प्रफुल बनसोड, कोषाध्यक्ष अविनाश खोबरागडे व सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विदर्भातील अनेक रक्तवीरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

Post a Comment

0 Comments