*सामूहिक वाचन, वाचन संवाद कार्यक्रम व वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन*
चांदूर रेल्वे : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सामूहिक वाचन, वाचन संवाद कार्यक्रम व वाचन कौशल्य कार्यशाळा या उपक्रमाचे राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे येथील स्व. अतुल जगताप स्मृति सभागृह मध्ये आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कला कनिष्ठ महाविद्यालय, चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विशद करत वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. नियमित वाचनामुळे ज्ञानवृद्धी, विचारक्षमता व संवादकौशल्य विकसित होते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या प्रसंगी श्री. प्रविण चव्हाण यांनी वाचन कौशल्य व श्रोत्यांशी संवाद साधण्याच्या तंत्रावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रभावी वाचन कसे करावे, आशय समजून घेऊन संवाद कसा साधावा, याबाबत त्यांनी उपयुक्त सूचना दिल्या.
व्यासपीठावर डॉ. जी. बी. संतापे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, श्री. के. के. सोळंके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रोशनी एन. भगत, महिला रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच आभारप्रदर्शन डॉ. एम. पी. वाघमारे यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सामूहिक वाचन उपक्रमात सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments