शुभ विचारांतच शिव” – ह.भ.प. वैभवश्रीजी पांडे
घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा
चांदूर रेल्वे - (ता. प्र.)
संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी दुसऱ्या दिवशी संगीतमय शिवपुराण कथेच्या प्रवचनात विदर्भ कन्या ह.भ.प. वैभवश्रीजी पांडे (वृंदावन) यांनी म्हटले.की, “शिव म्हणजे शुभ. आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारात जो चांगुलपणा आहे, तेच शिवतत्त्व आहे,” असे सांगत भक्तांना आत्मपरिवर्तनाचा संदेश दिला.
मंगळवारी संगीतमय शिवपुराण कथेत प्रवचन करतांना ह.भ.प. वैभवश्रीजी पांडे यांनी शिवपुराणातील आशय अत्यंत सोप्या आणि हृदयस्पर्शी शब्दांत उलगडला. त्यांनी सांगितले की, “शिव म्हणजे केवळ देव नाही, तर शुभत्वाचे प्रतीक आहे. या विश्वात जे काही मंगल, पवित्र आणि चांगले आहे, ते शिवतत्त्व आहे. आपण कुणाबद्दल वाईट बोलू शकतो, पण जर आपण शुभ बोलत असू, तर आपल्या शब्दांतच शिवत्व प्रकट होते.” कथेच्या माध्यमातून त्यांनी भक्तांना आत्मचिंतनाचा संदेश दिला. “आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारात चांगुलपणा यावा, हीच शिवपुराण कथेची खरी शिकवण आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी भक्ती म्हणजे केवळ पूजा नसून जीवन जगण्याची पवित्र पद्धत असल्याचे अधोरेखित केले. या भक्तिमय प्रवचनाने संपूर्ण परिसर शिवनामाच्या गजराने दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कथा श्रवणाचा लाभ घेतला. श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यातील हा शिवपुराण कथा सप्ताह भक्तांच्या मनात शिवत्व जागवणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा ठरत आहे.



Post a Comment
0 Comments