परंपरेला पोलीस अडथळा ? घुईखेडच्या शंकरपटाला एनओसी साठी टाळाटाळ
चांदूर रेल्वे - (ता. प्र.)
ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडलेला आणि वर्षानुवर्षे परंपरेने साजरा होणारा शंकर पट यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे लवकरच श्री बेंडोजी बाबा संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होत असून, या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या पारंपरिक शंकरपटाच्या आयोजनास तळेगाव दशासर पोलिसांनी एनओसी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सदर सोहळ्याच्या काळात गावात शंकरपटाचे आयोजन करणे ही जुनी आणि श्रद्धेची परंपरा आहे. मात्र, यंदा कोणतेही स्पष्ट कारण न देता पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या निर्णयामुळे धार्मिक परंपरा, ग्रामीण लोककला आणि गावच्या सांस्कृतिक वारशावर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि संस्थानकडून होत आहे.
“शंकरपट ही आमच्या गावाची श्रद्धा आणि ओळख आहे. पिढ्यान्पिढ्या हा कार्यक्रम शांततेत आणि शिस्तीत पार पडतो. तरीही यंदा तळेगाव दशासर पोलिसांनी कोणतेही ठोस कारण न देता एनओसी नाकारली आहे. ग्रामीण संस्कृती दाबण्याचा हा प्रयत्न असून प्रशासनाने तात्काळ निर्णयाचा फेरविचार करावा.”प्रवीण घुईखेडकर विश्वस्त, श्री. बेंडोजी बाबा संस्थान, घुईखेड परवानगी देण्याचा अधिकार आम्हाला नाही. शंकरपटाच्या आयोजनाकरिता परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजकांनी आणावी. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही काम करू. किरण औटे, ठाणेदार, तळेगाव दशासर


Post a Comment
0 Comments