Type Here to Get Search Results !

६८९ वर्षांची अखंड भक्ती; आज घुईखेडमध्ये बेंडोजी बाबांचा महाउत्सव ,दहिहांडी व भव्य शोभायात्रेने दुमदुमणार घुईखेड नगरी, भक्तांचा उसळणार जनसैलाब.

 ६८९ वर्षांची अखंड भक्ती; आज घुईखेडमध्ये बेंडोजी बाबांचा महाउत्सव ,दहिहांडी व भव्य शोभायात्रेने दुमदुमणार घुईखेड नगरी, भक्तांचा उसळणार जनसैलाब



सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे राहणार उपस्थित


चांदूर रेल्वे : 


संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेल्या श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज घुईखेड येथे भक्तांचा प्रचंड जनसैलाब उसळणार आहे. इ.स. १३३७ साली श्री संत बेंडोजी महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतली असून, या पवित्र सोहळ्याला यंदा ६८९ वर्षे पूर्ण होत आहेत. कालांतराने या ऐतिहासिक सोहळ्याला भव्य व दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. आज सोमवार (ता. २६) रोजी काल्याचे किर्तन, गोपाळकाला, दहिहांडी व भव्य शोभायात्रेनंतर यात्रा महोत्सवाला अधिकृत प्रारंभ होणार आहे. या पवित्र दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा जनसागर घुईखेडकडे लोटणार आहे.या सोहळ्याचे


विशेष आकर्षण म्हणजे लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरात पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे हे आज २६ जानेवारी रोजी घुईखेड येथे उपस्थित राहणार आहेत.



दि. १९ ते २५ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांसह विदर्भ कन्या ह.भ.प. वैभवश्रीजी पांडे (वृंदावन) यांच्या मधुर वाणीतील संगीतमय शिवमहापुराण कथा भाविकांसाठी आत्मिक समाधान देणारी ठरली. यानंतर आज २६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नांदगाव खंडेश्वर येथील ह.भ.प. उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सायंकाळी ४ वाजता गोपाळकाला व दहिहांडी, ६ वाजता महाआरती तर ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

याचदरम्यान श्री बेंडोजी महाराजांची भव्य शोभायात्रा निघणार असून, यात राज्यभरातून आलेल्या असंख्य दिंड्या सहभागी होणार आहेत. हा अद्भुत आणि भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार असून, त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारपासून यात्रा महोत्सवालाही प्रारंभ होणार आहे. तसेच ३० जानेवारी रोजी गोत आंबील महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर, राजाभाऊ चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


 २७ व २८ जानेवारीला भव्य जंगी शंकरपट


श्री बेंडोजी बाबा संस्थान व गावकरी मंडळ, घुईखेड यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ जानेवारी रोजी बेंडोजी बाबा एम.सी.व्ही.सी. महाविद्यालयाच्या मागील मैदानावर भव्यदिव्य जंगी शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत होणार असून, यामध्ये लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बेंडोजी बाबा संस्थान, शंकरपट कमिटी, व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

सन १३३७ चा ऐतिहासिक बिल्ला



श्री संत बेंडोजी महाराजांचा इतिहास अत्यंत प्राचीन व गौरवशाली आहे. संस्थानने सन १३३७ साली तयार केलेला भालदार व चोपदारांचा ऐतिहासिक बिल्ला आजही विश्वस्तांकडे सुरक्षित असून, तो या दिव्य परंपरेची आणि प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे.


Post a Comment

0 Comments