Type Here to Get Search Results !

आज शिवचरित्राचा खरा इतिहास उलगडणार! चांदूर रेल्वेत भव्य शिवराज्याभिषेक सोहळा आणि प्रेमकुमार बोके यांचे ओजस्वी व्याख्यान

 आज शिवचरित्राचा खरा इतिहास उलगडणार! चांदूर रेल्वेत भव्य शिवराज्याभिषेक सोहळा आणि प्रेमकुमार बोके यांचे ओजस्वी व्याख्यान



खासदार, आमदार, पोलीस अधिक्षक राहणार उपस्थित


चांदूर रेल्वे :- (ता. प्र.)


इतिहासाच्या पानांवरून धूळ झटकत स्वराज्याच्या तेजस्वी स्मृती पुन्हा जागविण्याची वेळ आली आहे… अफवा, अपप्रचार आणि विकृत कथनांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी चरित्र आज जनतेसमोर उलगडणार आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, चांदूर रेल्वे यांच्या वतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त आज रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सरस्वती शाळेसमोर, जुना बस स्टँड येथे भव्य शिवराज्याभिषेक सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.



या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे शिवश्री प्रेमकुमार बोके (अंजनगाव सुर्जी) यांचे अभ्यासपूर्ण आणि परखड व्याख्यान. शिवचरित्राचा सखोल अभ्यास, ऐतिहासिक संदर्भ आणि तर्कशुद्ध मांडणी यामुळे त्यांचे व्याख्यान म्हणजे इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास” या विषयावर ते स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी, युद्धनीती, प्रशासन कौशल्य, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यावर प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून


खासदार अमर काळे, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा, ग्रामिण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी श्रद्धा उदावंत, अ. भा. प्रा. पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पवार, प्रदीप जोशी, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भगोले, जिल्हाध्यक्ष संतोष वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा, प्रसिद्ध उद्योजक संदीप गिरासे, तालुकाध्यक्ष विवेक राऊत आदींची उपस्थिती राहणार आहे. 






सदर कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने साकारला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा हे विशेष आकर्षण ठरणार असून जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमणार आहे. शिवकालीन वेशभूषा, आकर्षक देखावे आणि राष्ट्रभक्तीने भारलेले सांस्कृतिक सादरीकरण यामुळे उपस्थितांना जणू रायगडावरच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असल्याचा भास होणार आहे. शिवप्रेमी, नागरिक, विद्यार्थी, पत्रकार बांधव आणि महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, चांदूर रेल्वेच्या वतीने करण्यात आले.


Post a Comment

0 Comments