Type Here to Get Search Results !

अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक:**मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण*

*
        अमरावती, दि. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या (महाराष्ट्र विधानपरिषदेची द्विवार्षिक निवडणूक) प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया उद्या, दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असून, आज सर्व मतदान पथके पोलीस बंदोबस्तात साहित्यासह केंद्रांवर रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आहेत. या निवडणुकीत शांततेत व सुरळीतपणे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
         या निवडणुकीत एकूण 3 उमेदवार रिंगणात असून, प्रत्यक्ष मतदान पसंतीक्रम पद्धतीने होणार आहे. यामध्ये मतदारांना उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रम देण्याची मुभा असेल. या मतदारसंघांत एकूण 451 मतदार असून, यामध्ये 226 महिला व 225 पुरुष मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाकरिता उपविभाग स्तरावर एकूण 7 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
       यामध्ये धारणी मतदान केंद्रावर 42 मतदार (20 पुरुष, 22 स्त्री), अचलपूर केंद्रावर 69 मतदार (33 पुरुष, 36 स्त्री), मोर्शी केंद्रावर 81 मतदार (43 पुरुष, 38 स्त्री), दर्यापूर केंद्रावर 60 मतदार (30 पुरुष, 30 स्त्री), तिवसा-भातकुली केंद्रावर 38 मतदार (18 पुरुष, 20 स्त्री), अमरावती केंद्रावर 95 मतदार (48 पुरुष, 47 स्त्री) आणि चांदूर रेल्वे मतदान केंद्रावर 66 मतदार (33 पुरुष, 33 स्त्री) आपले मत नोंदवतील. ही केंद्रे अनुक्रमे तहसील कार्यालय धारणी, उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर, तहसील कार्यालय मोर्शी, तहसील कार्यालय दर्यापूर, उपविभागीय अधिकारी तिवसा-भातकुली कार्यालय कॅम्प रोड अमरावती, 7/12 संगणकीकरण कक्ष, अमरावती तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे येथे स्थापन करण्यात आली आहेत.
        सातही मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक व शिपाई असे एकूण 42 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्या स्तरावरून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे झोनल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. आज सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथून सर्व पथके रवाना झाली. मतदानासाठी आयोगाचे मतदान कार्ड किंवा प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मतदारांची ओळख पटवण्यासाठी नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी आणि महानगरपालिका क्षेत्रात मनपाचे सहाय्यक आयुक्त मतदान केंद्रावर उपस्थित राहतील.
        जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच केंद्राच्या आत मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त बंदी आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष छत्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाचा दिवस हा कामकाजाचा दिवस असल्याने सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत केंद्र परिसर आणि 100 मीटरच्या बाहेर नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी तैनात राहतील. उद्या, 18 जून रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व मतपेट्या चोख सुरक्षेत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सुरक्षा कक्षामध्ये ठेवल्या जातील. त्यानंतर सोमवार, दिनांक 22 जून 2026 रोजी नियोजन भवन येथेच मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments